ओळख पटवण्याचे काम सुरू
जळगाव (प्रतिनिधी) :- शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गजबजलेल्या गोलाणी मार्केटमधून आज (सोमवार, दि. १७ नोव्हेंबर) दुपारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. दुपारी दोन वाजेच्या सुमारास एका ४२ वर्षीय अज्ञात तरुणाने मार्केटच्या चौथ्या मजल्यावरून खाली उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

दुपारच्या सुमारास दोन वाजता गोलाणी मार्केटमध्ये नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू असतानाच, चौथ्या मजल्यावरून या तरुणाने अचानक खाली उडी घेतली. जमिनीवर जोरात आदळल्याने हा तरुण गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या घटनेनंतर मार्केटमधील व्यापारी आणि नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
घटनेची माहिती मिळताच जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून गंभीर जखमी अवस्थेतील तरुणाला तात्काळ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जिल्हा रुग्णालय) उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय पथकाने तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
या तरुणाने नेमक्या कोणत्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले, हे अद्याप समजू शकलेले नाही. सदर मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नसून, जळगाव शहर पोलीस त्याचे नाव व पत्ता शोधण्याचे काम करत आहेत. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. जळगाव शहर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल सतीश पाटील, वीरेंद्र शिंदे, नंदू पाटील, राहुल पांचाळ यांनी घटनास्थळी पाहणी केली.








