जिल्हापेठ पोलीस स्टेशनला वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्यांनी दिली फिर्याद
जळगाव (प्रतिनिधी) : येथील जिल्हा कारागृहात बुधवार दि. १० जुलै रोजी सकाळी एका बंद्याचा धारदार शस्त्राने खून केल्याप्रकरणी खळबळ उडाली होती. याप्रकरणी वरिष्ठ तुरुंगाधिकारी गजानन पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शेखर हिरालाल मोघे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेखर मोघे याला अटक करण्यात आली आहे.
जिल्हा कारागृहामध्ये बुधवारी घडलेली खुनाची घटना राज्यभर चर्चिली जात आहे. या घटनेमध्ये वरिष्ठ तुरुंगाधिकारी गजानन विठ्ठल पाटील (वय ५४, रा. शासकीय निवासस्थान, कारागृह परिसर, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथील दाखल खुनाच्या गुन्ह्यातील पाच संशयित आरोपी हे जिल्हा कारागृहात आहेत.(केसीएन)यातील बंदी अरबाज उर्फ गोलू अजगर खान (वय २६,रा. भुसावळ) हा दि. ५ मार्च २०२२ पासून तर त्याच खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी संशयित बंदी मोहसीन अजगर खान (वय २५), शेखर हिरालाल मोघे (वय २५), आकाश सुखदेव सोनवणे (वय २४), मयुरेश रमेश सुरवाडे (वय २५, सर्व रा. भुसावळ) हे चौघे दि. ७ नोव्हेंबर २०२३ रोजी मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथून न्यायालय आणि कारागृह उपमहानिरीक्षक, औरंगाबाद यांच्या आदेशाने जळगावच्या जिल्हा कारागृहात न्याय बंदी म्हणून आलेले आहेत.
कारागृहातील आकाश सोनवणे, निलेश ठाकूर आणि शेखर मोघे यांना बॅरेक क्र. ३ या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहहे. तर मयुरेश सुरवाडे, अरबाज खान, मोहसीन खान यांना बॅरिक क्रमांक ४ येथे ठेवण्यात आलेले आहे. दरम्यान बुधवारी दि. १० जुलै रोजी सकाळी साडेसहा वाजता फिर्यादी गजानन पाटील यांनी कारागृहातील राऊंड घेतला.(केसीएन)त्यानंतर बंद्यांचा चहा नाश्ता झाल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांना सुरक्षाबाबत सूचना देऊन साडेसात वाजेच्या सुमारास ते कारागृहातून बाहेर निघाले. नंतर ८ वाजेच्या सुमारास कारागृहातून शिट्टी फुंकण्याचा आवाज आल्याने गजानन पाटील लगेच कारागृहात आले.
त्यावेळेला बंदी मोहसीन अजगर खान हा जखमी अवस्थेत लाल फाटकाजवळ होता तर कर्तव्यावर असलेले शिपाई गणेश राजेंद्र पाटील आणि श्रावण बारबोले, नितीन सपकाळे, विक्रम हिवरकर यांच्यासह न्याय बंदी आकाश सोनवणे, मयुरेश सुरवाडे, अरबाज खान हे देखील जखमी मोहसीन खान जवळ दिसून आले.(केसीएन)मोहसीन खान याला जखमी झाल्यामुळे रक्तस्त्राव न होत असल्याने खाजगी रिक्षात पोलीस शिपाई गणेश पाटील, राजेंद्र पाटील, होमगार्ड समाधान सोनवणे यांचेसोबत जखमी बंद्याचा श्वासोश्वास सुरू असल्याने आधी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले.
त्यावेळी कारागृह शिपाई राजेंद्र पाटील यांनी सांगितले की, बॅरेक क्र. ३ मधून बंदी शेखर मोघे याने सकाळी ८ वाजेच्या सुमारास बॅरेक क्र. ४ येथे जाऊन बंदी मोहसीन अजगर खान हा झोपलेला असताना त्याच्या गळ्यावर आणि छातीवर धारदार वस्तूने वार केले आहेत. सदरची घटना ही मोहसीन खान यांच्यासोबत असणाऱ्या सहबंद्यांनी पाहिलेली आहे, अशी माहिती गजानन पाटील यांना दिली.(केसीएन)त्यानंतर जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मोहसीन खान याला तपासून मयत घोषित केल्याचे समजले. त्यानुसार फिर्यादी वरिष्ठ तुरुंग अधिकारी गजानन पाटील यांनी संशयित आरोपी शेखर मोघे याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेमुळे जिल्हाभरासह राज्यभरात खळबळ उडाली आहे.