जळगाव (प्रतिनिधी) – जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस १ ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यात साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून ६ ऑक्टोबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सांस्कृतिक भवन, महाबळ रोड, जळगाव येथे सकाळी साडेदहा वाजता जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक संघ तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या विविध संस्थांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे. असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्वजनिक पदयात्रा, प्रभात फेऱ्या, सभा, विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा व ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या बिगर सहकारी संस्थांचा सत्कार, गौरव, आरोग्य शिबीर, चर्चासत्र, परिसंवाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदे व योजना विषयक बाबींचा माहिती,वृध्दांचे हक्क, ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अधिकाधिक संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे.असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.