भडगाव तालुक्यातील घटना
भडगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील कजगाव शिवारातील शेतात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात तीन वासरे मृत झाली तर एक वासरू गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे पशुधन मालकांत घबराट पसरली आहे. गेल्या १५ दिवसांत हिंस्र प्राण्यांनी केलेला हा दुसरा हल्ला आहे. या घटनेचा वनखात्यातर्फे पंचनामा करण्यात आला आहे.
गावातील शेतकरी रमेश भालचंद्र वाणी यांच्या कजगाव-कनाशी रस्त्यावर असलेल्या शेतात बांधलेल्या पशुधनावर वन्यप्राण्याने हल्ला केला. ही घटना वनविभागास कळविल्यानंतर वनविभागाचे ज्ञानेश्वर भालेराव पाटील, अशोक पिरा महाजन यांनी भेट देऊन पंचनामा केला. वन्यप्राण्यांच्या उमटलेल्या पंजाची पहाणी केली. मात्र हा हल्ला करणारा अज्ञात वन्यप्राणी नेमका कोणता, याबाबत वनविभागाकडून माहिती मिळाली नाही.
पंधरा दिवसांपूर्वी कजगाव भडगाव मार्गावरील महावितरण कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या कैलास धरमचंद जैन यांच्या शेतात बांधलेल्या पशुधनावर हिंस्र वन्यप्राण्याने हल्ला करत दोन गोन्हे ठार तर एक गोन्हा गंभीर जखमी केला होता. या घटनेस पंधरा दिवस उलटत नाही, तोच पुन्हा हिंस्र प्राण्याने हल्ला चढवत तीन वासरे ठार केली तर एक गंभीर जखमी केले आहे.