भुसावळ रेल्वे फिल्टर पंप परिसरातील धक्कादायक घटना
भुसावळ (प्रतिनिधी) – येथील रेल्वे फिल्टर पंप परिसरात जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी एका रेल्वे सुपरवायझरची लोखंडी रॉडने डोक्यात वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रसाद यशवंत कुलकर्णी असे मृत सुपरवायझरचे नाव असून, याप्रकरणी संशयित आरोपी आकाश भानुदास गोरखा याच्याविरुद्ध भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, कल शनिवार ४ जुलै रोजी संध्याकाळी रेल्वे फिल्टर पंपचे पर्यवेक्षक (सुपरवायझर) प्रसाद कुलकर्णी हे ड्युटीवर होते. रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास कुलकर्णी हे वीज पॅनलसमोरील खुर्चीवर बसलेले असताना, आरोपी आकाश गोरखा याने जुन्या वादाचा राग मनात धरून तेथे असलेल्या लोखंडी रॉडने कुलकर्णी यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला.
या हल्ल्यादरम्यान कुलकर्णी यांनी आरडाओरड केली असता, जवळच काम करत असलेले रेल्वे कंत्राटदार अनिल तुकाराम सोनवणे व मुकेश मोरे हे मदतीसाठी धावले. यावेळी संशयित आरोपी आकाश गोरखा हातातील लोखंडी रॉड फेकून पळून जाताना त्यांनी पाहिले. घटनास्थळी प्रसाद कुलकर्णी हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते.
मृत प्रसाद कुलकर्णी आणि आरोपी आकाश गोरखा यांच्यात काही दिवसांपूर्वी भंगार चोरीच्या कारणावरून मोठा वाद झाला होता. याच वादाच्या आणि रागाच्या भरात आकाशने कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच आरपीएफचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी रेल्वे ॲम्ब्युलन्स बोलावून जखमी कुलकर्णी यांना तत्काळ रेल्वे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, रुग्णालयातील कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले.
याप्रकरणी प्रत्यक्षदर्शी अनिल सोनवणे यांच्या तक्रारीवरून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.








