मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई ;६ लाख ११ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त
२ जणांविरुद्ध अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल
मुक्ताईनगर (विशेष प्रतिनिधी): मुक्ताईनगर शहरात प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची बेकायदेशीर साठवणूक करून विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि पोलिसांनी संयुक्त धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या छाप्यात सुमारे ५ लाख ३६ हजार रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू, गुटखा, पानमसाला आणि ७५ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ६ लाख ११ हजार ३२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ११ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११:०० वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर शहरातील भोईवाडा भागात ही कारवाई करण्यात आली.


नेमकी काय आहे घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर येथील भोईवाडा परिसरात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा करून त्याची विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभाग, जळगावचे सहाय्यक आयुक्त योगराज किशोर सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ११ ऑगस्ट रोजी रात्री ११:०० वाजता भोईवाडा येथे अचानक धाड टाकली.
या छाप्यात महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदी असलेला सुगंधित तंबाखू, पानमसाला व गुटखासदृश अन्नपदार्थांचा मोठा साठा मिळून आला. अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील अधिसूचनेचे उल्लंघन करून या मालाची विक्रीसाठी बेकायदेशीर साठवणूक करण्यात आली होती.
दोन जणांवर गुन्हा दाखल
या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त योगराज किशोर सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून १२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६:५७ वाजता मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दोन संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संशयित आरोपींची नावे: १. अंकित संजय सापधरे (रा. भोईवाडा, मुक्ताईनगर, ता. मुक्ताईनगर) २. पवन दौलतानी शेठ (रा. बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश)
कायदेशीर कारवाई व कलम: संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच ‘अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम’ च्या कलम ३०(२)(a), २६(२)(i), २६(२)(iv), २७(३)(d), २७(३)(e), ३१, ५९ आणि ६३ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
भोईवाडा परिसरातून जप्त करण्यात आलेला प्रतिबंधित माल मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथून आणल्याचा प्राथमिक संशय असून, या तस्करीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास मुक्ताईनगर पोलीस करत आहेत.









