पुतणीचे पती , दिराविरुद्ध जळगावात गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील एका व्यापाऱ्याला पुतणीच्या पती व दिराने गुंतवणूक करण्याचे आमीष देत तसेच रक्कम पाचपट करून देण्याचे सांगत वेळोवेळी पैसे घेऊन तब्बल ४८ लाख ५६ हजार रुपयांना फसवणूक केली आहे. या फसवणूकप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपाल प्रभूलाल राठी (वय ६३ रा. पिंप्राळा, जळगाव) असे फिर्यादीचे नाव आहे. सण २०१८ – १९ मध्ये त्यांनी त्यांची कंपनी विकली. त्याचे त्यांना ८८ लाख रुपये मिळाले होते.(केसीएन) ही माहिती त्यांची पुतणी ॲड. वर्षा विजय मंडोरे आणि तिचे पती विजय जगदीश मंडोरे यांना होती. त्यांची पुतणी वर्षा ही धरणात व रस्त्यात गेलेल्या शेतकऱ्याच्या जमिनीचा वाढीव मोबदला मिळवून देण्याचे काम करीत होती तर वर्षाचे पती विजय मंडोरे व त्यांचे भाऊ लक्ष्मीनारायण मंडोरे हे एलपीजी गॅस किटचा व्यवसाय करीत होते. त्यांनी तो व्यवसाय बंद करून वर्षा मंडोरे हिच्या व्यवसायाला मदत करू लागले होते.
दरम्यान फिर्यादीकडे फॅक्टरी विकल्याचे पैसे आल्याची माहिती असल्याने जावई विजय मंडोरे व त्यांचे भाऊ लक्ष्मीनारायण मंडोरे यांनी फिर्यादी गोपाल राठी यांना पैसे गुंतवणूक करण्याचे सांगितले. गुंतवणूक केलेल्या पैशाच्या रकमेच्या पाच ते सहा पट रक्कम परत देऊ असे आमिष त्यांनी दाखविले.(केसीएन) मात्र ही गोष्ट गोपाल राठी यांना पटली नाही. तरीही, आम्ही कुटुंबातील घटक आहोत. आमच्यावर विश्वास नाही का वगैरे बतावणी करत संशयित आरोपी विजय मंडोरे व लक्ष्मीनारायण मंडोरे यांनी फिर्यादी गोपाल राठी यांना गुंतवणूक करण्यासाठी भाग पाडले. सुरुवातीला ५० लाख रुपयांची मागणी करून ३ करोड रुपये परत करू अशी बतावणी दोघांनी फिर्यादी गोपाल राठी यांना केली होती. गोपाल राठी यांनी वेळोवेळी बँक खात्यातून ऑनलाईन तसेच आरटीजीएसद्वारे असे ४८ लाख ५६ हजार रुपये गुंतविले.मात्र त्यांना कुठलाही मोबदला देण्यात आला नाही.
दरम्यान दि. १७ ऑक्टोबर २०१९ ते ११ मे २०२२ दरम्यान संशयित आरोपी विजय जगदीश मंडोरे आणि लक्ष्मीनारायण जगदीश मंडोरे यांनी गोपाल राठी यांच्याकडून ४८ लाख ५६ हजार रुपये घेऊन फसवणूक केली म्हणून त्यांनी रामानंदनगर पोलीस स्टेशन येथे धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रामानंदनगर पोलीस स्टेशनचे पीएसआय प्रदीप बोरुडे करीत आहेत.