मंत्री गुलाबराव पाटील यांची वचनपूर्ती
जळगाव (प्रतिनिधी) : त्रिस्तरीय अंतर्गत हातपंप व वीजपंप देखभालीसाठी जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर निर्मित पदावर नियुक्त नियमित कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्ता तसेच नियमित पदावरून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वेतनासाठी साहाय्यक अनुदाने स्वरूपात निधी उपलब्ध करून देण्याचा विषय शासकीय स्तरावर तब्बल ४६ वर्षांपासून प्रलंबित होता. पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी यासंदर्भात पुढाकार घेतला. या कर्मचाऱ्यांचे शासनाने दायित्व स्वीकारण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी सादर केला होता. त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.
राज्यातील जि.प.च्या आस्थापनेवरील हातपंप, वीजपंप दुरुस्तीसाठी विविध संवर्गातील १०७४ कर्मचाऱ्यांच्या वेतन, निवृत्तीवेतनाचा खर्च रुपये ४५.९१ कोटीचे शासनाने दायीत्व स्वीकारले व या प्रलंबित मागण्यांची पूर्तता झाली. या निर्णयाने जि.प. वरील या कर्मचाऱ्यांचा वेतन व भत्त्यांचा भार कमी होणार असून या कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते जिल्हा परिषदेमार्फत वेळेवर अदा करणे शक्य होणार आहे. याबद्दल हातपंप व वीजपंप देखभाल दुरुस्ती कर्मचारी संघटनेने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.
पालकमंत्री यांनी या मागणीच्या पूर्तीसाठी प्रधान सचिव पाणीपुरवठा विभाग, आयुक्त भु.स.वि.य. ग्रामविकास सचिव, अर्थ विभाग सहसचिव यांच्या वेळोवेळी बैठका घेत सतत पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे हा विषय मांडला. राज्यातील जि.प. च्या आस्थापनेवरील हातपंप. वीजपंप दुरुस्तीसाठी विविध संवर्गात कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी नियमित २३७ व ८३७ सेवानिवृत्त कर्मचारी अशा एकूण १०७४ कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. राज्यस्तरीय संघटनेचे एस. वाय. शेख, अतुल कापडे, एस.टी. सूर्यवंशी, विष्णू बडगुजर, सतीश महाजन यांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले आहेत.