शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुदद्वाराच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे. एका ६५ वर्षीय इसमाला शस्त्रक्रियेमुळे दिलासा मिळाला असून त्याने वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले आहे. दरम्यान, यशस्वी शस्त्रक्रिया करणाऱ्या टीमचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी कौतुक केले आहे.
जळगाव शहरात राहणाऱ्या एका ६५ वर्षीय इसमाला गुदद्वाराचा कर्करोग (रेक्टम) झाल्याचे निदान झाले होते. या रुग्णाला त्रास होत असल्याने तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तपासणीसाठी आला होता. तपासणीनंतर त्याला शस्त्रक्रियेची गरज असल्याचे निदान शल्यचिकित्सा विभागातील युनिट ३ चे प्रमुख डॉ. रोहन पाटील यांनी केले. त्यानंतर सदर रुग्णावर कॅन्सरची यशस्वी शस्त्रक्रीया ही सर्जरी विभागांतर्गत करण्यात आली. पथक प्रमुख व सहयोगी प्रा. डॉ.रोहन पाटील, सहाय्यक प्रा. ईश्वरी भोंबे, वरीष्ठ निवासी डॉ.अभिषेक चौधरी यांनी रुग्णावर ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.
शस्त्रकियेसाठी बधिरीकरणशास्त्र विभागप्रमुख डॅा. सुरेखा चव्हाण, सहयोगी प्रा. डॉ.अमित हिवरकर यांचेसह डॉ.झिया-उल-हक, डॉ. बिंदुश्री राजेश, डॉ.अभिषेक, डॉ.झैद पठाण यांनी परिश्रम घेतले. शल्यचिकित्सा विभाग प्रमुख डॉ.मारोती पोटे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी कामगिरीबद्दल अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, अधिसेविका प्रणिता गायकवाड यांनी रुग्णाला पुष्पगुच्छ देऊन रुग्णालयातून निरोप दिला.
“सदर शस्त्रक्रियेसाठी खाजगी रुग्णालयात लाखो रुपयांवर खर्च येतो. अशा रुग्णांना उपचारासाठी मुंबई-पुणे येथे जावे लागते. तथापि, सद्यस्थितीत या शस्त्रक्रियेची सुविधा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगांव येथे देखील उपलब्ध आहे.”
– डॉ. गिरीश ठाकूर, अधिष्ठाता.
“दैनंदिन जीवनात खाण्यातील बदल, बद्धकोष्ठता यासारख्या त्रासांमुळे गुदद्वारात कर्करोग होण्याची शक्यता असते. रुग्णांनी अधिक माहितीसाठी व उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगांव येथे शल्यचिकित्सा विभागाला संपर्क करावा”
– डॉ. रोहन पाटील, युनिट ३ चे प्रमुख.