महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक संपन्न
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील वाढते तापमान नियंत्रित करण्यासाठी आणि पर्यावरण पूरक उपक्रम राबवण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिका आणि ‘ग्रीन सिटी फाउंडेशन’ यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महापौर दीपमाला काळे आणि मनपा आयुक्त आदित्य जीवने यांच्या कक्षात ही बैठक झाली. जळगाव शहराचे तापमान कमी करणे आणि पर्यावरण संवर्धन करणे या दृष्टीने सविस्तर चर्चा करण्यात आली.

‘ग्रीन सिटी फाउंडेशन’ने सन २०२६ ते २०३० या आगामी ५ वर्षांच्या कालावधीत जळगावचे तापमान कमी करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. यासाठी महानगरपालिकेचे पूर्ण सहकार्य लाभणार आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील विविध भागांसह शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाईल.
“वृक्षारोपणाचे काम हे केवळ नावापुरते न राहता संवर्धनाच्या दृष्टीने झाले पाहिजे. यासाठी आपण व्यवस्थित नियोजन करत आहोत. पुढील चार महिन्यांत शहरात अतिशय चांगल्या पद्धतीने वृक्षारोपण केले जाईल, जेणेकरून भविष्यात जळगावचे तापमान कमी होण्यास मोठी मदत होईल.”
— दीपमाला काळे, महापौर
बैठकीला उपायुक्त निर्मला गायकवाड, सहाय्यक आयुक्त संजय राऊत, पर्यावरण विभागाचे प्रकाश पाटील यांच्यासह ‘ग्रीन सिटी फाउंडेशन’चे विजयकुमार वाणी आणि डॉ. धनंजय बेंद्रे आदी पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. जळगावला हिरवेगार आणि थंड ठेवण्याच्या या मोहिमेत नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.









