जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये गणपती बाप्पांचे आगमन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात करण्यात आले. गणरायाच्या आगमनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.


यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत गोफ विणणे, लेझीम तसेच विविध आकर्षक पारंपरिक नृत्यांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या तालबद्ध हालचाली, लेझीमचा नाद आणि गोफ विणण्याच्या सुंदर सादरीकरणाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शाळेचा परिसर गणेशमय झाला.‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!’च्या जयघोषात बाप्पांचे स्वागत करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलाविष्कारांनी सर्वांचे मन मोहून घेतले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आपली संस्कृती, परंपरा आणि सामूहिक सहभागाचे महत्त्व अनुभवता आले.शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे गणपती बाप्पांच्या आगमनाचा सोहळा अविस्मरणीय ठरला.









