जळगाव (प्रतिनिधी) :आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गोदावरी हेल्थ सिटी येथे योगाभ्यास शिबिराचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. या शिबिरात योगगुरू चैतन्य क्षीरसागर तसेच योग शिक्षिका डॉ. कोमल पाटील यांनी योगाचे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले. त्यांनी विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितांकडून सराव करून घेतला. याप्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी योगामुळे व्यक्तीच्या शारीरिक आरोग्यासह मानसिक संतुलन, कार्यक्षमता आणि जीवनशैलीत होणार्या सकारात्मक बदलांविषयी मार्गदर्शन केले. नियमित योगाभ्यास हा निरोगी आणि आनंदी जीवनाचा पाया असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात गोदावरी फाउंडेशन अंतर्गत कार्यरत सर्व वैद्यकीय सेवांशी संबंधित महाविद्यालयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमास सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक व अध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. योगाभ्यास शिबिरामुळे उपस्थितांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण झाली असून, नियमित योग करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.










