चोपड्यात घरगुती गॅसची बेकायदा रिफिलिंग; १.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त


लोहाना पेट्रोल पंपामागील पत्र्याच्या शेडवर पोलिसांचा छापा; एकाला ताब्यात
चोपडा : शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरगुती गॅस सिलेंडरमधून वाहनांमध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत १ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास लोहाना पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये हा प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. यावेळी प्रमोद विजय महाजन (वय ३६, रा. अरुण नगर, चोपडा) हा कोणताही परवाना नसताना घरगुती गॅस सिलेंडरमधून बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग करताना आढळून आला.
पोलिसांनी घटनास्थळावरून इलेक्ट्रॉनिक मोटर व नळ्या जोडलेली दोन गॅस रिफिलिंग यंत्रे (₹४० हजार), वजन करण्यासाठी वापरले जाणारे दोन इलेक्ट्रॉनिक काटे (₹२० हजार) तसेच एचपी आणि इंडेन कंपनीचे ५ भरलेले व १२ रिकामे असे एकूण १७ घरगुती गॅस सिलेंडर (₹७६ हजार ५००) असा एकूण ₹१ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल पंकज रमाकांत ठाकूर (वय ३५) यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २८७, २८८ तसेच अत्यावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन देसले करीत आहेत.









