“हॅपी रक्षाबंधन ताई” स्टेटस ठेवून घेतला गळफास ; जळगावात दशरथ नगरातील घटना
मोबाईल गेमच्या आहारी गेल्याचा संशय, तपास सुरू
जळगाव ( प्रतिनिधी ) –रक्षाबंधन सणाचा उत्साह आणि आनंदाचे वातावरण असतानाच जळगाव शहरात एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली आहे. दशरथ नगर परिसरात राहणाऱ्या एका १८ वर्षीय तरुणाने “हॅपी रक्षाबंधन ताई” असा मोबाईलवर स्टेटस ठेवून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रोहित साहेबराव धनगर असे मृत तरुणाचे नाव आहे. मोबाईल गेमच्या आहारी गेल्याने आणि त्यातील आर्थिक व्यवहारामुळे आलेल्या नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.


रोहित धनगर हा आई-वडील आणि लहान बहिणीसोबत दशरथ नगर (आसोदा रोड) येथे राहत होता. शुक्रवारी, २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सणाच्या दिवशी सकाळी रोहितने आपल्या लहान बहिणीकडून उत्साहात राखी बांधून घेतली. त्यानंतर आईला मामाच्या गावी जाण्यासाठी नवीन बस स्थानकावर सोडले.(केसीएन)दुपारी तो वडिलांसोबत मेहरुण परिसरातील आत्याच्या घरी गेला होता. दुपारी २ वाजेच्या सुमारास “माझे एक काम आहे, मी थोड्या वेळात येतो” असे सांगून तो दशरथ नगर येथील घरी परतला. घरी कुणीही नसताना रोहितने गळफास घेतला.
काही वेळाने हा प्रकार निदर्शनास येताच नातेवाईकांनी व स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.(केसीएन)सकाळीच बहिणीने ज्या हातावर राखी बांधली होती, त्याच हातावर राखी असलेल्या अवस्थेत रोहितचा मृतदेह पाहून रुग्णालयात कुटुंबीयांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे मन हेलावून टाकणारा होता. ऐन सणाच्या दिवशीच उघड्या पडलेल्या या दुःखाच्या डोंगरामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मोबाईल गेमचे व्यसन ठरले जीवघेणे ?
घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, रोहितला मोबाईलवरील विविध ऑनलाईन गेमचे व्यसन जडले होते. या गेममधील आर्थिक व्यवहारांमुळे तो मोठ्या नैराश्यात होता आणि याच कारणातून त्याने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासातून समोर येत आहे. शनिपेठ पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









