फुलगाव शिवारात १ लाख रुपयांची १.२ किमी लांबीची वीज तार लांबवली


एनसीसी कंपनीच्या सिमेंट/वीज कामावरील चोरांचा डोळा; वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल
वरणगाव
परिसरातील फुलगाव शिवारात पिंपरी सेक्युरिटी रोडवरील विजेच्या खांबांवरून अज्ञात भामट्याने तब्बल १.२ किलोमीटर लांबीची ॲल्युमिनियमची वीज वाहक तार लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत सुमारे १ लाख रुपयांच्या तारेचा समावेश असून, वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर येथे राहणारे व मूळचे बिहार येथील रहिवासी राहुलकुमार रंग बहादूर सिंग (वय ३१) हे ‘एनसीसी लिमिटेड’ कंपनीत सिनियर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कंपनीमार्फत फुलगाव शिवारातील माजी सैनिक कॉलनीजवळ पिंपरी सेक्युरिटी रोडवर विजेच्या खांबांचे काम चालत आहे.
१ जुलैच्या रात्री १० वाजेपासून ते २ जुलैच्या सकाळी १० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी रस्त्यावरील विजेच्या खांबांवर टांगलेली १ लाख रुपये किमतीची १.२ किमी लांबीची ॲल्युमिनियमची तार कंपनीच्या संमतीशिवाय चोरून नेली.
चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर कंपनीच्या वतीने प्राथमिक पडताळणी करून शुक्रवारी (७ ऑगस्ट) रात्री ११:२४ वाजेच्या सुमारास वरणगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. राहुलकुमार सिंग यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
घटनास्थळाची पाहणी वरणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागूल यांनी केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार गणेश राठोड करत आहेत. परिसरातील संशयितांची चौकशी सुरू असून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.









