चाळीसगाव शहरातील तरुणासोबत घडला प्रकार
चाळीसगाव (प्रतिनिधी) : शहरातील तरुणाची ऑनलाईन पद्धतीने वेगवेगळे टास्क देत तब्बल पावणे १३ लाखात फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत जळगाव सायबर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव शहरातील देशमुख वाडा येथे राहणाऱ्या २७ वर्षीय तरूणाला टेलीग्राम व व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून वेगवेगळे टास्क देवून त्यांच्याकडून ऑनलाईन पध्दतीने वेळोवेळी पैसे घेण्यात आले. तब्बल १२ लाख ७९ हजार ३७५ रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी दि. १८ जून रोजी उघडकीला आली. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
चाळीसगाव शहरातील देशमुख वाडा येथे विशाल रामराव सुर्यवंशी (वय २७) हा तरूण वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून तो आपला उदरनिर्वाह करतो. दि. १० मे २०२४ रोजी विशालला प्लेक्स मुव्हीज या टेलीग्रामवर तसेच व्हॉटस्ॲपवर आणि कस्टमर केंअर व्हॉटस्ॲप क्रमांकावरून फोन व मॅसेज करून त्याला टास्क पुर्ण करण्याचे बहाणा करून त्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर विशालकडून वेळोवेळी बॅक खात्यातून ऑनलाईन पध्दतीने एकुण १४ लाख ३२ हजार ४०७ रूपये घेतले. त्यातील १ लाख ५३ हजार ०३२ रूपये परतावा केला. परंतू उर्वरित रक्कम १२ लाख ७९ हजार ३७५ परत दिली नाही.
दरम्यान, फसवणूक झाल्याचे विशालच्या लक्षात आल्यानंतर मंगळवारी दि. १८ जून रोजी रात्री साडेआठ वाजता जळगाव येथील सायबर पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार जळगाव सायबर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहे.