
मृत्यू अपघातात झाल्याचे भासवून ५० लाखांचा विमा क्लेम दाखल
बनावट साक्षीदार आणि खोटी माहिती देऊन फसवणुकीचा कट रचल्याचा आरोप
मेहुणबारे (प्रतिनिधी) : विमा कंपनीकडून मोठी रक्कम मिळविण्याच्या उद्देशाने मृत्यू अपघातात झाल्याचे भासवून बनावट साक्षीदार तयार करणे, अपघाताची खोटी माहिती देणे आणि खोटा गुन्हा दाखल करून विमा कंपनीची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये काही खासगी व्यक्तींसह पोलीस अधिकारी, कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी आणि विमा एजंट यांचा समावेश असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.


पोलीस ठाण्यातील नोंदीनुसार, या प्रकरणातील घटना ९ जून २०२५ रोजी रात्री ११.४८ वाजेपासून सुरू झाल्याचे नमूद असून, चाळीसगाव तालुक्यातील जामदा शेत शिवार हे घटनास्थळ आहे. या प्रकरणात १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.२८ वाजता मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या तक्रारीनुसार संबंधित आरोपींनी संगनमत करून बनावट साक्षीदार तयार केले. तसेच मृत्यू हा रस्ते अपघातात झाल्याचे भासवून अपघाताबाबत खोटी माहिती देण्यात आली. त्याआधारे खोट्या स्वरूपाचा गुन्हा दाखल करून विमा कंपनीकडून आर्थिक लाभ मिळविण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. सुरुवातीला फिर्यादीच्या विमा कंपनीकडे ५० लाख रुपयांचा विमा क्लेम दाखल करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणाचा तपास सुरू असताना आरोपी क्रमांक चार यांनी क्लेम मागे घेतल्याचेही नोंदीत नमूद आहे.
त्यानंतर आरोपी क्रमांक चार यांनी मृत व्यक्तीचे नाव असलेल्या फिर्यादीच्या विमा कंपनीच्या डेबिट कार्डचा वापर करून १० लाख रुपये लुबाडून विमा कंपनीची फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४), ६१(२) तसेच नोंदीतील इतर लागू कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात नितेश हिम्मत पाटील (रा. एरंडोल), आकाश सुनील पाटील (रा. जुवाडा, ता. भडगाव), प्रेमचंद त्र्यंबक पाटील (रा. एरंडोल), कविता संजय पाटील (रा. एरंडोल, जि. जळगाव), तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक रविंद्र एकनाथ बत्तासे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मंदार करबेकर, विमा एजंट प्रवीण मयाराम पाटील (रा. पारोळा), पोलीस कर्मचारी महेंद्र प्रकाश पाटील, पोलीस कर्मचारी सचिन अशोक निकम आणि सुनील अशोक निकम यांचा समावेश असल्याचे पोलीस नोंदीत नमूद आहे.
या प्रकरणाती मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील तपास सुरू असून, या कथित विमा फसवणूक प्रकरणात आणखी कोणते धागेदोरे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








