
कोविड काळातील साहित्य खरेदीत कोट्यवधींचा गैरव्यवहार
जळगाव (प्रतिनिधी) : कोविड महामारीच्या काळात ग्रामीण रुग्णालय, यावल आणि जिल्ह्यातील इतर आरोग्य संस्थांसाठी दैनंदिन वापराचे साहित्य खरेदी करताना नियमबाह्य पद्धतीने तब्बल कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव शिवाजीराव चव्हाण यांच्यासह ७ जणांविरुद्ध यावल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जळगाव येथील प्रभारी प्रशासकीय अधिकारी डॉ. मनोज मंगल पाटील (वय ४९) यांनी या संदर्भात सरकारतर्फे यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उपसंचालक आरोग्यसेवा, नाशिक मंडळ यांच्या १२ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या पत्राच्या आणि चौकशी अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.
नेमका प्रकार काय?
६ ऑक्टोबर २०२० ते २५ मे २०२२ या कोविड काळात जिल्हाधिकारी किंवा महाराष्ट्र शासनाकडून कोणतेही आदेश नसताना तसेच कोणत्याही आरोग्य संस्थेकडून मागणी नसताना तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी अधिकारांचा गैरवापर केला. कोणतीही पूर्वपरवानगी न घेता आणि आर्थिक तरतूद नसताना साबण, टेबल क्लॉथ, झाडू, टॉर्च सेल, फायर एक्स्टिंग्विशर, सॅनिटायझर यांसारख्या किरकोळ वस्तूंची अवाजवी व अवास्तव प्रमाणात खरेदी करण्यात आली. यावल ग्रामीण रुग्णालयाशी संबंधित या खरेदीत १७ लाख ७२ हजार ६७९ रुपये, तर जिल्ह्यातील इतर ग्रामीण रुग्णालयांसाठीही अशाच प्रकारे कोट्यवधी रुपयांच्या उपभोग्य वस्तूंची नियमबाह्य खरेदी केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.
ई-निविदा आणि आर्थिक नियमांचे उल्लंघन
सन २०२० मध्ये ई-टेंडर प्रक्रिया राबवताना किमान तीन संस्था तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरणे आवश्यक असताना, केवळ ‘मे. गृहलक्ष्मी महिला औद्योगिक संस्था मर्या. नांदूर पो. मांडसांगवी, ता. जि. नाशिक’ ही एकच संस्था पात्र ठरली होती. असे असतानाही नियम डावलून फायनान्शियल बिड उघडण्यात आले आणि या संस्थेला कार्यारंभ आदेश देण्यात आले. संस्थेकडून कोणतीही सुरक्षा ठेव घेण्यात आली नाही किंवा करारनामाही करण्यात आला नाही.
वॅट (VAT) आणि जीएसटीमध्येही घोळ
जुलै २०१८ नंतर वॅट प्रणाली बंद झालेली असतानाही काही बिलांमध्ये वॅट आकारून ती ट्रेझरीकडे सादर करण्यात आली, तर अनेक बिलांवर सरसकट १८ टक्के जीएसटी आकारला गेला. ही रक्कम शासनाकडे जमा केली किंवा कसे, याबाबत कोणतीही स्पष्टता आढळून आलेली नाही. तसेच, जिल्हा रुग्णालय स्तरावर खरेदी केलेल्या साहित्याची देयके ग्रामीण रुग्णालय यावल स्तरावरून पारित करण्याचे नियमबाह्य आदेश डॉ. बाबुलाल भंगा बारेला (प्रभारी वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय यावल) यांना देण्यात आले होते.
या संपूर्ण गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, वैद्यकीय अधिकारी तथा प्रभारी प्रशासकीय अधिकारी डॉ. यु. बी. तासखेडकर, लेखा अधीक्षक हरीपाल आर. वाणी, तत्कालीन अभिलेखपाल मिलिंद निवृत्ती काळे, डॉक्टर बाबुलाल बारेला, तत्कालीन सहाय्यक अधीक्षक सुधाकर दगडू चोपडे आणि गृहलक्ष्मी महिला औद्योगिक संघ यांचा अध्यक्ष यांच्यासह संबंधित पुरवठादार संस्थेवर ठपका ठेवण्यात आला असून यावल पोलीस पुढील तपास करत आहेत.








