
पोलीस अधीक्षकांचे आदेश
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी तसेच प्रशासकीय कारणास्तव आणि जनहितार्थ जळगाव जिल्ह्यातील ४ पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. जळगाव जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आज, १९ नोव्हेंबर २०२६ रोजी हे बदलीचे आदेश जारी केले आहेत.


बदली झालेल्या अधिकाऱ्यांचा तपशील खालीलप्रमाणे
पोलीस निरीक्षक आशिष मधुकर लव्हेंगळे : बोदवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या लव्हेंगळे यांची आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव येथे प्रभारी अधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक विशाल प्रभुलाल जयस्वाल : शनिपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी (कामकाज नि.क. जळगाव) असलेल्या जयस्वाल यांची AHTU (मानवी तस्करी प्रतिबंधक कक्ष), जळगाव येथे प्रभारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक नितीन सुदाम पाटील : जळगाव आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी असलेल्या पाटील यांची शनिपेठ पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी बदली झाली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेकानंद दत्तात्रय राळेभात : बोदवड पोलीस ठाण्याचे दुय्यम अधिकारी म्हणून कार्यरत राळेभात यांची बोदवड पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी पदोन्नतीवजा/प्रशासकीय बदली करण्यात आली आहे.
अतिरिक्त कार्यभारातून मुक्तता
बदलीच्या या आदेशासोबतच दोन अधिकाऱ्यांना अतिरिक्त कार्यभारातून मुक्त करण्यात आले आहे. मानव संसाधन विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे यांना AHTU प्रभारी अधिकारी पदाच्या अतिरिक्त कार्यभारातून मुक्त करून त्यांच्या मूळ पदावर (प्रभारी अधिकारी, मानव संसाधन विभाग, जळगाव) पूर्णवेळ कामकाज करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जळगाव शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांना शनिपेठ पोलीस ठाण्याच्या अतिरिक्त कार्यभारातून मुक्त करण्यात आले आहे.
बदली झालेल्या सर्व अधिकाऱ्यांनी तात्काळ नवीन नेमणुकीच्या ठिकाणी कर्तव्यावर हजर होऊन त्याचा अनुपालन अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयास सादर करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.








