
जळगाव, चोपडा, धरणगाव आणि शनिपेठ परिसरातील दुचाकी चोरीचे गुन्हे उघड; सुमारे १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील रामानंद नगर पोलिसांनी दुचाकी चोरट्यांविरोधात धडाकेबाज कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीच्या एकूण पाच मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमुळे जळगावसह चोपडा, धरणगाव आणि शनिपेठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. हस्तगत केलेल्या दुचाकींची एकूण किंमत सुमारे १ लाख रुपये आहे.


रामानंद नगर पोलीस ठाण्यात बापू दत्तू कोळी यांच्या मालकीची बजाज प्लॅटिना मोटारसायकल (क्रमांक MH-19 BE-8161) ही ९ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री घरासमोरून चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.
पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी गुन्हे शोध पथक आणि अंमलदारांना मोटारसायकलचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तपास पथकाने तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या आधारे कांचननगर परिसरातून निर्मल ठाकूर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याचा साथीदार मनोज मोहन रंधे (रा. नशिराबाद) याच्यासह जळगाव शहर, चोपडा शहर, पिंपळा परिसर आणि इच्छादेवी चौकातून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलीस प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.
पोलिसांनी मनोज रंधे याला नशिराबाद येथून ताब्यात घेत १६ नोव्हेंबर २०२६ रोजी अटक केली. त्यानंतर १९ नोव्हेंबर रोजी दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी रिमांडमध्ये घेण्यात आले. या दरम्यान आरोपींकडून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.
हस्तगत करण्यात आलेल्या दुचाकी पुढीलप्रमाणे :
१. बजाज प्लॅटिना – किंमत १५ हजार रुपये, क्रमांक MH-19 BE-8161.
२. हिरो पॅशन प्रो – किंमत ३० हजार रुपये, विनानंबर प्लेट.
३. बजाज प्लॅटिना – किंमत २५ हजार रुपये, विनानंबर प्लेट.
४. सीडी डिलक्स – किंमत २० हजार रुपये, विनानंबर प्लेट.
५. टीव्हीएस सीटी १०० (लाल रंग) – किंमत १० हजार रुपये, विनानंबर प्लेट.
या कारवाईत रामानंद नगर, चोपडा शहर, धरणगाव आणि शनिपेठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे आणि पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोलीस कर्मचारी जितेंद्र राजपूत, योगेश बारी, मनोज मराठे, सुभाष धांडे, मुकुंद गवते आणि सागर नन्नवरे यांनी केली.
रामानंद नगर पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे दुचाकी चोरट्यांचे धाबे दणाणले असून, चोरीच्या वाहनांचा शोध घेण्यात पोलिसांना महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.








