
८१ विशेष शिबिरांच्या माध्यमातून हजारो लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ; आमदार अमोल जावळे यांच्या हस्ते विविध योजनांचे वितरण व गुणवंतांचा गौरव



यावल ( प्रतिनिधी ) : क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त संपूर्ण जळगाव जिल्ह्यात ११ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह-२०२६’चा बुधवारी (दि. १८ नोव्हेंबर) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल येथे उत्साहात समारोप करण्यात आला. या सप्ताहांतर्गत जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील आदिवासी गावे व पाड्यांवर एकूण ८१ विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, हजारो पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या निर्देशानुसार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्या पुढाकाराने या सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, सांस्कृतिक वारसा, लोककला आणि अस्मिता यांचे जतन व संवर्धन करण्यासोबतच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अमोल जावळे होते. यावेळी त्यांनी आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देत आगामी विकासकामांबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या.
आदिवासी पाड्यांसाठी पाणी व सौरऊर्जेवर भर
जिल्ह्यातील आदिवासीबहुल भागात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्र्यांनी १२.५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती आमदार अमोल जावळे यांनी दिली. तसेच महावितरणकडून वीजपुरवठा करणे शक्य नसलेल्या दुर्गम आदिवासी पाड्यांमध्ये सौरऊर्जेच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्याचे काम प्रस्तावित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले.
महिला बचत गटांसाठी दोन कोटींचा ‘बहिणाई मॉल’
महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू, हस्तकला, वनोपज आणि खाद्यपदार्थांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी यावल येथे दोन कोटी रुपये खर्चून ‘बहिणाई मॉल’ अर्थात बचत गट भवन उभारण्यात येत आहे. या ठिकाणी शिलाई मशीन, आधुनिक किचन तसेच उत्पादनांच्या विक्रीसाठी स्वतंत्र हॉल अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आमदारांनी दिली.
लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीबाबत आवाहन
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ नियमित मिळण्यासाठी महिलांनी दरवर्षी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचे आमदार जावळे यांनी स्पष्ट केले. आधार कार्ड, बँक खाते आणि मोबाईल क्रमांक एकमेकांशी संलग्न असणे तसेच संबंधित कागदपत्रांवरील नावात एकसारखेपणा असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. सायबर फसवणूक टाळण्यासाठी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला ओटीपी देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.
आयुष्मान भारत कार्ड वितरणाचे १०० टक्के उद्दिष्ट
प्रत्येक नागरिकाला आजारपणाच्या काळात पाच लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य उपचारांचा लाभ मिळावा, यासाठी आयुष्मान भारत कार्ड काढणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील दीड ते दोन महिन्यांत प्रत्येक गाव व पाड्यावर विशेष शिबिरे आयोजित करून आयुष्मान भारत कार्ड वितरणाचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना प्रकल्प अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या.
विविध योजनांचे लाभ वितरण; ९२ महिला बचत गटांना मदत
समारोप कार्यक्रमात आमदार अमोल जावळे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण करण्यात आले. महिला सक्षमीकरण आणि स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी ९२ महिला बचत गटांना लाभ वितरित करण्यात आला. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या योजनेअंतर्गत चार लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. पशुसंवर्धन विभाग व पंचायत समिती यावल यांच्या माध्यमातून १६ आदिवासी शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत चोपडा तालुक्यातील २६, रावेर तालुक्यातील ३२ आणि यावल तालुक्यातील २० लाभार्थ्यांना लाभ वितरित करण्यात आला. चोपडा तहसीलअंतर्गत वनपट्ट्यांशी संबंधित ७ ई व १२ ई मधील दोन लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. तसेच चोपडा येथील १२ आणि यावल येथील २० लाभार्थ्यांना रेशन कार्डांचे वितरण करण्यात आले.
नवनियुक्त शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त झालेल्या १६ नवनियुक्त शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. तसेच ‘पुढारी टॅलेंट सर्च’ परीक्षेत यश संपादन करणाऱ्या सहा गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
आदिवासी समाजातील पारंपरिक ज्ञान व सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणारे मुनाफ तडवी, कलिंदर तडवी व पारंपरिक वैदू यांचा हैदराबाद येथे आयोजित राष्ट्रीय आरोग्य परिषदेत सहभाग नोंदवल्याबद्दल गौरव करण्यात आला. तसेच वारली आर्ट पेंटिंगच्या व्यवसायाच्या माध्यमातून दिल्लीत होणाऱ्या महिला उद्योजक मेळाव्यासाठी निवड झालेल्या हिना जमादार, लोहार आदिवासी महिला बचत गटाच्या प्रमुख, यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
रक्तदान शिबिरात ३४ जणांचे रक्तदान; ४० नागरिकांची आरोग्य तपासणी
समारोप सोहळ्यानिमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव आणि तालुका आरोग्य अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी आणि विविध संघटनांच्या एकूण ३४ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले, तर ४० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन
सेवा सप्ताहादरम्यान आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती व प्रचार-प्रसिद्धी, पारंपरिक वैद्य व उपचार पद्धती, आधार कार्ड नोंदणी, कृषी विज्ञान केंद्र पाल यांच्यामार्फत बियाणे व शेतीविषयक मार्गदर्शन, पेसा जनजागृती पथनाट्य, पशुसंवर्धन विभागामार्फत चारा सकस बनविण्याबाबत मार्गदर्शन तसेच केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीविषयक पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांमुळे आदिवासी बांधवांना विविध शासकीय सेवा-सुविधांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध झाली.
अधिकारी व मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, जिल्हा कृषी अधीक्षक कुरबान तडवी, उपविभागीय अधिकारी बबन काकडे (फैजपूर), प्रकल्प अधिकारी अरुण पवार, तहसीलदार मोहनमाला नाझिरकर (यावल), तहसीलदार भाऊसाहेब थोरात (चोपडा), गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड (यावल), अंजली बर्गे (चोपडा), वानखेडे (रावेर), पोलीस निरीक्षक धारभळे (यावल), वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल फटांगरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता जहांगीर तडवी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे, मीनाक्षी सुलताने, पवनकुमार पाटील, लेखाधिकारी दीपकांत वाघ यांच्यासह प्रकल्प कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, आदिवासी संघटनांचे आजी-माजी पदाधिकारी आणि आदिवासी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी केले. सूत्रसंचालन विनोद ढगे यांनी केले, तर सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रविण दाभाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
अशा प्रकारे जनजातीय गौरव सेवा सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविणे, आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देणे आणि आदिवासी संस्कृतीचे संवर्धन करण्याचा संदेश देत या सप्ताहाची सांगता करण्यात आली.








