ॲग्री स्टार्टअप, कृषी प्रक्रिया उद्योग, सोलर ड्रायर मशीन, पापड उद्योगासह आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची पर्वणी; २२० हून अधिक स्टॉल्स, प्रदर्शन प्रवेश मोफत
जळगाव (प्रतिनिधी) : कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन प्रयोग आणि शेतीपूरक उद्योगांच्या संधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ॲग्रोवर्ल्डतर्फे उद्या, २० नोव्हेंबरपासून जळगाव शहरातील एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेज येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. २० ते २३ नोव्हेंबर या चार दिवसांच्या कालावधीत होणाऱ्या या प्रदर्शनात ॲग्री स्टार्टअप, कृषी प्रक्रिया उद्योग, फळे व भाजीपाला सोलर ड्रायर मशीन, पापड उद्योग, दाल मिल यांसह आधुनिक शेती तंत्रज्ञानाची विविध दालने शेतकऱ्यांसाठी आकर्षण ठरणार आहेत.


ॲग्रोवर्ल्ड गेल्या १४ वर्षांपासून कृषी विस्ताराच्या क्षेत्रात कार्यरत असून जळगावातील यंदाचे हे १२ वे प्रदर्शन आहे. या प्रदर्शनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थापक शैलेंद्र चव्हाण यांनी केले आहे.
या चार दिवसीय प्रदर्शनात २२० पेक्षा अधिक स्टॉल्स उभारण्यात येणार असून शेतकऱ्यांसाठी प्रवेश पूर्णपणे मोफत असणार आहे. विशेष म्हणजे, लहान-मोठ्या कृषी यंत्रे व औजारांचे ४० हून अधिक स्टॉल्स या प्रदर्शनात असतील. बदलते हवामान, मजूरटंचाई, कमी पाण्यात अधिक उत्पादन, अद्ययावत कृषी तंत्रज्ञान, करार शेती आणि शेतीतील वाढत्या गरजा लक्षात घेऊन प्रदर्शनाची मांडणी करण्यात आली आहे. शेतीकामासाठी मजुरांची कमतरता भासत असताना फवारणीसाठी ड्रोन, विविध प्रकारची आधुनिक कृषी यंत्रे आणि शेती औजारांची माहिती व प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना पाहता येणार आहेत.

कमी पाणी आणि कमी श्रमात अधिक उत्पादन देणाऱ्या तंत्रज्ञानासह विविध पिकांमधील कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, टिश्यूकल्चर केळीच्या १२ हून अधिक कंपन्या, फळे व भाजीपाला नर्सरी, सुधारित बियाण्यांचे आधुनिक वाण आणि नॅनो फर्टिलायझर यांची माहिती प्रदर्शनात उपलब्ध होणार आहे. याशिवाय शेततळ्यांचे अस्तरीकरण, सोलर फार्मिंग, शेततार कुंपण, झटका मशीन, किचन गार्डन टूल्स, परसबाग आणि टेरेस गार्डनसाठी विविध प्रकारच्या रोपांची माहितीही शेतकऱ्यांना मिळणार आहे.
तसेच बँकिंग सुविधा, शासकीय योजना, कृषी विभागाचे अनुदान आणि आधुनिक शेतीविषयक मार्गदर्शन एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कृषीपूरक उद्योगातून उद्योजकतेची संधी यंदाच्या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण म्हणजे शेतीसोबतच कृषीपूरक उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या नवउद्योजकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध संधी. ॲग्री स्टार्टअप, कृषी आधारित प्रक्रिया उद्योग, फळे व भाजीपाला सोलर ड्रायर मशीन, पापड उद्योग आणि दाल मिल यांसारख्या व्यवसायांची सविस्तर माहिती येथे मिळणार आहे.
यापूर्वी अशा उद्योगांची माहिती घेण्यासाठी नवउद्योजकांना अहमदाबाद, पुणे आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये जावे लागत होते. मात्र, यंदा ॲग्रोवर्ल्डने खानदेशातील इच्छुक उद्योजकांसाठी ही संधी जळगावातच उपलब्ध करून दिली आहे.
शेतीपूरक व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध शासकीय अनुदान योजनांची माहितीही प्रदर्शनात दिली जाणार आहे. यामध्ये मल्चिंगसाठी ३२ हजार रुपये, विडमॅट तंत्रज्ञानासाठी एक लाख रुपये, पशुपालन व्यवसायासाठी पाच ते आठ लाख रुपये, तर मुरघास हार्वेस्टर व बेलरसाठी १३ ते १९ लाख रुपयांपर्यंतच्या अनुदानाची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे शेतीला जोडधंद्याची जोड देऊन उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करू इच्छिणाऱ्यांसाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे.
पहिल्या दिवशी पाच हजार जणांना मोफत बियाणे
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी निर्मल सीड्सतर्फे पहिल्या पाच हजार नागरिकांना किचन गार्डन बियाण्यांचे पाकीट मोफत वितरित करण्यात येणार आहे. याशिवाय दररोज शंभरपेक्षा अधिक जणांना लकी ड्रॉच्या माध्यमातून आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. तसेच सिका ई-मोटर्सतर्फे ई-स्कूटरचे बंपर बक्षीसही ठेवण्यात आले आहे.
या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड, अपेडा आणि मेट्रोजन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड आहेत. तर प्लॅन्टो कृषीतंत्र, निर्मल सीड्स, श्रीराम ठिबक, ओम गायत्री नर्सरी, पाटील बायोटेक, टाईयो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पॉवरट्रक, कृषिदुत बायोहर्बल प्रायव्हेट लिमिटेड, आनंद ॲग्रो केअर, अनंत इरिगेशन (धानुका) आणि सातपुडा ऑटोमोबाईल्स हे सहप्रायोजक आहेत.
आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती, कृषी यंत्रांचे प्रात्यक्षिक, शेतीपूरक व्यवसायांच्या संधी आणि शासकीय अनुदान योजनांचे मार्गदर्शन अशा विविध बाबींचा समावेश असलेल्या या प्रदर्शनाचा जळगाव जिल्ह्यासह खानदेशातील शेतकरी, नवउद्योजक आणि कृषी क्षेत्राशी संबंधित नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.








