जळगाव : अचानक फ्रिजने पेट घेतल्यामुळे घरातील साहित्य आगीच्या विळख्यात जळून खाक झाले. ही घटना सोमवारी दि. २४ जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास जिल्हापेठ परिसरात घडली. आजूबाजूच्या नागरिकांनी अग्नीशमन विभागाला कळविल्याने ही आग वेळीच नियंत्रणात आली. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने कुठलीही जिवीतहानी झाली नाही.
शहरातील जिल्हा पेठ परिसरात खासदार स्मिता वाघ यांच्या घराजवळ प्रभाकर नाना पाटील यांचे घर आहे. सोमवारी पाटील कुटुंबिय घर बंद करून बाहेर गेलेले होते. त्या वेळी दुपारी चार वाजेच्या सुमारास अचानक त्यांच्या घरातून धूर येत असल्याचे शेजारील रहिवाशांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबतची माहिती
तात्काळ महापालिकेचया अग्नीशमन विभागाला दिली. त्या वेळी अग्नीशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. घरी कोणीही नसल्याने दरवाजा तोडून पाण्याचा मारा करण्यात आला व ही आग विझवण्यात आली. फ्रीजने पेट घेतल्याने ही आग लागल्याचे दरवाजा तोडल्यानंतर लक्षात आले. त्यात फ्रीज जळून खाक होण्यासह घरातील कपडे, वायरिंग व इतर साहित्यही जळाले. आग विझवल्यानंतरदेखील अर्धा ते पाऊण तास घरातून धूर निघत होता.
या परिसरात एकमेकांना लागून घरे आहे. तसेच या घरांच्यावर आयुर्वेद पंचकर्म केंद्रही आहे. सुदैवाने ही आग वेळीच नियंत्रणात आल्याने आजूबाजूला आगीची झळ बसली नाही. तसेच घरात कुणीही नसल्यामुळे कुठलीही हानी झाली नाही.