जळगाव;- महाराष्ट्राच्या जडणघडणीत सातत्याने स्फुलिंग जागृत ठेवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना सातत्याने साथ देणाऱ्या महाराणी येसूबाई यांच्या अनेक दुर्लक्षित पैलूंवर प्रथमच सविस्तरपणे कादंबरी व्दारे मांडणी करुन ज्ञानेश मोरे यांनी मोठे ऐतिहासिक कार्य केले असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या जळगाव विभागीय केंद्राच्या वतीने शनिवारी ज्ञानेश मोरे यांच्या महाराणी येसूबाई संभाजी भोसले या कादंबरीचे प्रकाशन श्री.पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अरुणभाई गुजराथी हे हेाते तर अतिथी म्हणून केंद्राचे अध्यक्ष ॲङ रवींद्रभैय्या पाटील उपस्थित होते. श्री. जयंत पाटील म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांबददल चुकीची मांडणी केली गेली. पुराव्यांच्या आधारे नव्याने मांडणी करुन अनेक पैलू मांडले गेले. संभाजी महाराजांचे जीवन वादळी होते. त्यांना साथ देणाऱ्या येसूबाईंचे अनेक पैलू दुर्लक्षित राहिले. या कादंबरीच्या निमित्ताने ज्ञानेश मोरे यांनी येसूबाईंच्या जीवनाची सविस्तर मांडणी करुन मोठे काम केले आहे. या कादंबरीचे ऐतिहासिक महत्त्व आहे असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र देशमुख यांनी केले. यावेळी मंचावर माजी मंत्री डॉ.सतीश पाटील व गुलाबराव देवकर, माजी आमदार दिलीप सोनवणे व दिलीप वाघ, अब्दुल गफार मलिक, किरण खलाटे, आदी उपस्थित होते.