एरंडोल (प्रतिनिधी) : डॉ. नरेंद्र ठाकूर यांची जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील देहदान विषयक समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती बद्दल डॉ. ठाकूर यांचे विविध स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.
या वर्षी पहिल्यांदाच देहदान विषयक समितीची स्थापना करण्यात आली आहे. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर हे समितीचे अध्यक्ष असून उपाध्यक्ष म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, शरीर रचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. अब्दुल राफे, न्याय वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रमेश वासनिक यांचा समावेश यात आहे. डॉ. नरेंद्र ठाकूर हे सुखकर्ता फाउंडेशन ह्या सेवाभावी संस्थेमार्फत गेल्या बारा वर्षांपासून ‘अवयवदान देहदान’ क्षेत्रात व्याख्यान, लेख, सोशल मीडिया, मुलाखती, चर्चासत्रे याद्वारे जनजागृती करत आहेत.
देहदान संकल्प पत्र भरणे, देहदानासाठी येणाऱ्या अडचणींबाबत प्रशासनाशी सुसंवाद साधणे, देहदान सुकरपणे होण्यासाठी मार्गदर्शन करणे व देहदानाविषयी जनसामान्यांमध्ये असलेले गैरसमज व अंधश्रद्धा दूर करण्याबाबत सुखकर्ता फाउंडेशन कार्य करत असते. मानवी देह हे ‘स्वेच्छा देहदानाच्या’ स्वरूपातच वैद्यकीय महाविद्यालयास प्राप्त होत असतात. सद्यस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये देहदानाची टक्केवारी अत्यंत कमी प्रमाणात आढळून येत आहे.
नव्यानेच गठीत करण्यात आलेल्या समितीच्या माध्यमातून ‘स्वेच्छा देहदानाविषयीच्या’ कार्यास गती मिळावी व याविषयी भरीव कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था यांचे ही मार्गदर्शन व सहकार्य शासनास मिळावे य अपेक्षेने अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव यांनी डॉ. नरेंद्र ठाकूर यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती केलेली आहे.