मुक्ताईनगर येथे दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
मुक्ताईनगर (प्रतिनिधी):- दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीला मोटारसायकलवर बसवून निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांनी दोघांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मयत प्रमोद प्रल्हाद तायडे (वय ४२, रा. नरवेल, ता. मुक्ताईनगर) हे १६ एप्रिल रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास दारूच्या नशेत असताना आरोपी अजय भिका नायके (रा. नरवेल) याने त्यांना आपल्या मोटारसायकलवर बसवले. सुंदर पातोंडी ते नाचनखेडा (जि. बुरहाणपूर, म.प्र.) या रस्त्यावर अजय याने मोटारसायकल निष्काळजीपणे चालवली. प्रमोद तायडे हे नशेत असल्याने मोटारसायकलवरून पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघात झाल्यानंतर प्रमोद तायडे यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्याऐवजी, मुख्य आरोपी अजय भिका नायके आणि त्याचा लहान भाऊ अमृत भिका नायके यांनी घटना लपवण्याच्या उद्देशाने जखमी प्रमोद यांना घटनास्थळावरून हलवून दुसऱ्या ठिकाणी नेऊन टाकले. वेळेवर उपचार न मिळाल्याने अखेर प्रमोद तायडे यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी मयताचा भाऊ ईश्वर भगवान तायडे (वय ३७, रा. नरवेल) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुक्ताईनगर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजेंद्र चाटे हे करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अपघाताची माहिती लपवणे आणि जखमीला मदत न करणे किती महागात पडू शकते, हे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.









