जळगाव ( प्रतिनिधी ) – जागतिक हिपॅटायटिस दिन २०२६ निमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगाव येथे विद्यार्थ्यांमध्ये हिपॅटायटिसविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्डिओ व्हॅस्क्युलर रेस्पिरेटरी फिजिओथेरपी विभागातर्फे २९ जुलै रोजी आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या प्रसंगी डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, जळगाव येथील जनरल मेडिसिन विभागाचे रेसिडेंट डॉक्टर डॉ. तन्मय मेहता हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. त्यांनी हिपॅटायटिस या आजाराचे विविध प्रकार, संसर्गाची कारणे, लक्षणे, वेळेवर निदानाचे महत्त्व, लसीकरणाची आवश्यकता, प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच उपलब्ध आधुनिक उपचारपद्धती याबाबत सविस्तर माहिती दिली.
हिपॅटायटिससारख्या गंभीर आजाराविषयी समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याची जबाबदारी प्रत्येक आरोग्यसेवा क्षेत्रातील विद्यार्थ्यांची असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य जनजागृती उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना हिपॅटायटिसच्या प्रतिबंध व उपचारांविषयी अधिक व्यापक माहिती मिळाली.
व्याख्यानानंतर आयोजित प्रश्नोत्तर सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. या संवादात्मक सत्रामुळे विद्यार्थ्यांचा विषयावरील अभ्यास अधिक समृद्ध झाला. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये हिपॅटायटिसविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत झाली तसेच प्रतिबंधात्मक आरोग्यविषयक उपायांचे महत्त्व अधोरेखित झाले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सुमारे १३० विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. अमित जैस्वाल, डॉ. सचिन तेंडुलकर आणि डॉ. प्रियंका गुमनानी यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांनी या उपयुक्त व माहितीपूर्ण व्याख्यानाचे कौतुक करत अशा प्रकारचे आरोग्य जनजागृती कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.









