जळगाव (प्रतिनिधी) – अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी १६ रोजी जैन हिल्स येथील गांधी तीर्थला आवर्जून भेट दिली. यावेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी त्यांचे हृद्य स्वागत केले.
जैन हिल्स येथील गांधी तीर्थ पाहून डॉ. रवींद्र शोभणे यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केली ती अशी, “गांधी तीर्थ म्हणजे जैन हिल्स परिसरात श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी केलेला चमत्कार होय. ही केवळ दगडा मातीची इमारत नाही तर विचारांना आदान-प्रदान करणारी, मागच्या पिढीपासून पुढच्या पिढीपर्यंत विचार व आदर्शांचा तो अव्याहात प्रवाह आहे. त्या प्रवाहातून समाज घडवण्यासाठी, आदर्शांची रुजवत करण्याकरीता निर्माण केलेले असे अति भव्य हे शिल्प आहे.
हे गांधी तीर्थ पाहून मला अतिव आनंद झाला. महात्मा गांधीजींचे विचार, त्यांच्या चळवळी, एकूणच भारतीय स्वातंत्र्याच्या ध्यासातील प्रत्येक पानाचे डॉक्युमेंटेशन अतिशय चांगल्या पद्धतीने प्रस्तुत केले आहे. महात्मा गांधीजी समजून घ्यायचे असतील तर जळगावच्या गांधी तीर्थ ला प्रत्यक्ष भेट द्यायलाच हवी.”