जळगाव (प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांनी इंधन बचत आणि पर्यावरण संवर्धनाचा मार्ग अवलंबला आहे. संस्थेत दैनंदिन कामकाजासाठी इलेक्ट्रिक वाहनाचा प्रभावी वापर करण्यात येत असून, यामुळे डिझेलवरील खर्चात मोठी बचत होत आहे.
महाविद्यालय आणि हॉस्पिटल इमारतीदरम्यान अधिकारी व कर्मचारी यांच्या ये-जा तसेच आवश्यक कागदपत्रे पोहोचविण्यासाठी पूर्वी डिझेल वाहनांचा वापर केला जात होता. मात्र वाढते इंधन दर आणि पर्यावरण संरक्षणाची गरज लक्षात घेऊन प्रशासनाने इलेक्ट्रिक वाहनाचा पर्याय स्वीकारला.महाविद्यालय परिसरात विविध विभागांमध्ये वारंवार ये-जा करावी लागत असल्याने इलेक्ट्रिक वाहनाचा वापर अधिक सोयीस्कर आणि किफायतशीर ठरत आहे. विशेष म्हणजे अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रवासासोबतच आवश्यक साहित्य आणि कागदपत्रांच्या वाहतुकीसाठीदेखील या वाहनाचा उपयोग केला जात आहे.
या उपक्रमामुळे डिझेलवरील खर्चात लक्षणीय बचत होत असून प्रदूषणातही घट होत आहे. ऊर्जा बचत, पर्यावरण संरक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यावर संस्थेकडून सातत्याने भर दिला जात आहे.पर्यावरणपूरक उपक्रमांच्या माध्यमातून समाजासमोर सकारात्मक आदर्श निर्माण करण्याचा संस्थेचा प्रयत्न असून, अशा उपक्रमांमुळे इतर शैक्षणिक व वैद्यकीय संस्थांनाही प्रेरणा मिळत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.











