भुसावळातील इंदिरा नगरात जळगाव एलसीबीची कारवाई
भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील इंदिरा नगर परिसरात तीन तरुणांकडे धारदार तलवारी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर जळगाव स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने दि. १ एप्रिल रोजी धडक कारवाई करून तिघांना अटक केली. ही कारवाई भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली.
या प्रकरणी तिन्ही आरोपींना अटक करून त्यांच्या विरोधात विनापरवाना शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी त्यांना भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.(केसीएन)भुसावळ शहरात इंदिरा नगर परिसरात काही तरुणांकडे धारदार तलवारी असल्याची गुप्त माहिती स्थानीक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, पोहेकॉ. कमलाकर बागुल, गजानन देशमुख, गोपाल गव्हाळे, संघपाल तायडे आणि पोकॉ. सचिन पोळ यांनी संशयितांना पकडण्यासाठी सापळा रचला.
पथकाने इंदिरा नगर परिसरात छापा टाकून भरत यादव खंडारे (वय १९), सागर अनिल संघवी (वय २०) आणि सागर राजू यादव (वय २५, सर्व रा. इंदिरा नगर, भुसावळ) यांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या तिघांकडे पोलिसांनी झडती घेतली असता, त्यांच्याकडे विनापरवाना ४ धारदार तलवारी सापडल्या. जप्त करण्यात आलेल्या तलवारींची एकूण किंमत ६ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिन्ही आरोपींविरोधात भारतीय शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.