मुंबई (वृत्तसंस्था) :- राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान पाहायला मिळत आहे. वाढती रुग्णसंख्या, कोलमडलेली आरोग्य यंत्रणा, सोयी-सुविधा, औषधोपचार यासर्व गोष्टींवर ताण आला आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व स्तरावरुन मदतीचे हात पुढे येत असताना बॉलिवूडकरांनाही मदतीचा हात पुढे केला आहे. बॉलिवूड अभिनेता अजय देवगणसह अनेक बॉलिवूडकरांना पुन्हा एकदा कोरोनाबाधितांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत अनेक ठिकाणी कोव्हिड सेंटर उभारले जात आहे. मुंबईतील दादर परिसरात कोरोनाबाधितांवर उपचार व्हावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरातील मुंबई महानगरपालिकेने कोविड एचडीयू रुग्णालय उभारले आहे. शिवाजी पार्कमधील स्काऊट-गाईड हॉलमध्ये 20 रुग्णशय्या क्षमतेचे हे रुग्णालय आहे. हे रुग्णालय उभारण्यासाठी अजय देवगण मदत करत आहे.
या रुग्णालयात व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन सपोर्ट आणि इतर सुविधांचा समावेश असणार आहे. या कोव्हिड सेंटरसाठी अजय देवगण त्याची NY फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आर्थिक मदत करणार आहेत. नुकतंच NY फाऊंडेशनने सामाजिक उत्तरदायित्व म्हणून 1 कोटी रुपयांची देणगी महानगरपालिकेकडे सुपूर्द केली आहे.