जळगाव ;- कोरोना काळात मैदाने बंद असल्याने प्रशिक्षकांची कोंडी होत आहे. ही कोंडी सोडवण्यासाठी खारीचा वाटा म्हणून जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष क्रीडा शिक्षक प्रशांत कोल्हे यांच्याकडून क्रीडा प्रशिक्षकांना ५० किलो गहू, २० किलो तांदूळ व ५ किलो तूरडाळची मदत करण्यात आली.
कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी गेल्या दीड वर्षापासून मैदाने बंद असल्याने प्रशिक्षण बंद आहे त्यामुळे जळगावातील क्रीडा प्रशिक्षकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आशा परिस्थितीत जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष क्रीडाशिक्षक कोल्हे यांनी मदतीचा हात दिला आहे. त्यांनी जळगावातील ७ क्रीडा प्रशिक्षकांना प्रत्येकी ५० किलो गहू, २० किलो तांदूळ व ५ किलो तूरडाळ स्वरूपात मदत केली. ही मदत जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांच्या हस्ते वाटप करण्यात आली. या वेळी जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे सचिव राजेश जाधव, उपाध्यक्ष योगेश सोनवणे, जिल्हा युवा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ. रणजित पाटील, सचिव प्रा. हरिश शेळके उपस्थित होते.