भोकर बँक दरोड्यातील ३६ कोटींचा मुद्देमाल कोषागारात ठेवणार

२७ किलो सोने आणि १२ लाखांची रोकड जप्त; सुरक्षिततेसाठी पोलिसांकडून प्रक्रिया सुरू
जळगाव, प्रतिनिधी : भोकर येथील स्टेट बँकेच्या शाखेवर पडलेल्या सशस्त्र दरोड्यातील २७ किलो सोने आणि १२ लाख २६ हजार रुपयांची रोकड असा एकूण ३६ कोटी ४८ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हा मुद्देमाल जिल्हा कोषागार विभागात ठेवण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. वरिष्ठ स्तरावरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा मुद्देमाल कोषागार विभागाकडे हस्तांतरित केला जाणार आहे.
तीन दिवसांपूर्वी तोंडाला मास्क आणि हेल्मेट घातलेल्या चौघांनी भोकर गावातील स्टेट बँकेच्या शाखेत प्रवेश करून बंदुकीचा धाक दाखवला होता. बँकेत तारण ठेवलेले २७ किलो सोने आणि १२ लाख २६ हजार रुपयांची रोकड घेऊन दरोडेखोरांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने चारही संशयितांना पळून जाण्यापूर्वीच पकडले. त्यांच्याकडून सहा बॅगांमध्ये भरलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोषागारात ठेवणार
दरोड्यात जप्त करण्यात आलेला मुद्देमाल मोठ्या प्रमाणात असल्याने त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न महत्त्वाचा ठरला आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हा मुद्देमाल सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी पोलिसांनी जिल्हा कोषागार विभागाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर बैठकही झाल्याची माहिती असून, आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुद्देमाल कोषागार विभागाकडे सुपूर्द केला जाणार आहे.








