चार महिन्यांनंतर पोलिसांना जाग; विवस्त्र करून मारहाण प्रकरणात दोघांना अटक


व्हायरल व्हिडिओ ठरला तपासाचा टर्निंग पॉइंट; दोन अल्पवयीन बालकांवरही कारवाई
भुसावळ | प्रतिनिधी चार महिन्यांपूर्वी १८ वर्षीय तरुणाला विवस्त्र करून बेदम मारहाण केल्याच्या प्रकरणाला अखेर पोलिसांच्या कारवाईने नवे वळण मिळाले आहे. घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेत तपासाला वेग दिला. याप्रकरणी सिद्धेश महाडीक (१९) आणि सागर साळुंखे (१९) यांना अटक करण्यात आली असून, दोन अल्पवयीनांवरही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
भुसावळ शहर पोलीस ठाण्यात २४ एप्रिल रोजी दाखल झालेल्या मूळ गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३२४(४) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल होता. मात्र, चार महिने उलटूनही अपेक्षित कारवाई होत नसल्याने पीडित तरुणाच्या आईने अखेर १३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन तक्रार मांडली होती.
दरम्यान, समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडिओची पोलिसांनी पडताळणी केली. पीडिताच्या आईच्या पुरवणी जबाबासह तांत्रिक पुरावे तपासल्यानंतर मूळ गुन्ह्यात BNS १४०(१), १२७(२) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६६(E) आणि ६७ ही वाढीव कलमे जोडण्यात आली.
पोलिसांनी सिद्धेश महाडीक व सागर साळुंखे यांना अटक केली आहे. तर १७ वर्षे ११ महिन्यांच्या मुख्य संशयित बालकाला यापूर्वीच बाल सुधारगृहात हजर करण्यात आले असून, दुसऱ्या १७ वर्षीय बालकाला आज बाल सुधारगृहात पाठविण्यात आले.
या प्रकरणाचा पुढील तपास आता भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड करीत आहेत.








