बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

जळगाव | प्रतिनिधी : न्यायालयाच्या आदेशानुसार जप्त करण्यात आलेल्या घरावरील बँकेचे सील तोडून अनधिकृतपणे घरात प्रवेश केल्याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एफ.ए. रत्नमाला रेसिडेन्सी, प्लॉट क्रमांक ५२, सर्व्हे क्रमांक १६७/२, मेहरूण शिवार येथील घरासाठी विशाल गजानन डुकरे आणि आशा गजानन डुकरे यांनी आयडीबीआय बँकेकडून कर्ज घेतले होते. मात्र कर्जाचे हप्ते न भरल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित मालमत्ता जप्त करण्यात आली होती. बँकेने घराला सील लावून नोटीसही चिकटवली होती.
असा आरोप आहे की, २३ जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास संबंधित दाम्पत्याने बँकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता घरावरील सील व नोटीस तोडून घरात अनधिकृत प्रवेश केला आणि कुटुंबासह तेथे वास्तव्यास गेले.
या प्रकरणी आयडीबीआय बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक हंसराज कुंदनलाल राजपाल (वय ४७) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात विशाल गजानन डुकरे व आशा गजानन डुकरे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३२९(४), २२३ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.









