नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;- देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरण मोहिमेला गती देण्यात येत आहे. जागतिक योगदिनी लसीकरणाने वेग घेतला असून सोमवारी दिवसभरात 70 लाख लस देण्यात आल्या आहेत. लसीकरणाचा हा आतापर्यंतचा विक्रम आहे. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात लस देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारकडून नागरिकांनी मोफत लस देण्यात येत आहे.
केंद्र सरकारकडून सर्व नागरिकांना लस मोफत देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केली होती. तसेच आजपासून लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आला आहे. केंद्र सरकारने 75 टक्के लसींची खरेदी स्वतः करण्याचा निर्णय घेतला आहे. तर 25 टक्के लस खाजगी रुग्णालये खरेदी करणार आहेत. आता केंद्र सरकार लस विकत घेऊन राज्यांना देणार आहेत. याआधी राज्य त्यांच्या लस विकत घेत होते.
सोमवारी सकाळपासून लसीकरण मोहिम वेगात सुरू होती. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 70 लाखपेक्षा जास्त लस देण्यात आल्या आहेत. जानेवारी महिन्यापासून देशात कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर आणि जास्त धोका असलेल्या व्यक्तींना लस देण्यात आल्या. त्यानंतर 60 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. तसेच 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरणही सुरू झाले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढल्यावर 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्याची घोषणा करण्यात आली. आतापर्यंत राज्यांकडून 18 ते 45 वर्षांच्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येत होते. आजपासून केंद्र सरकारने हे लसीकरणही स्वतःकडे घेतले आहे.