जळगाव जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदांच्या निवडी जाहीर
जळगाव (प्रतिनिधी):- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या संघटनात्मक रचनेत मोठे फेरबदल करत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने नवीन जिल्हाध्यक्षांची घोषणा केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या पुनर्रचनेला आणि नवीन नियुक्तींना मंजुरी दिली आहे. ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत निरीक्षकांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे या निवडी करण्यात आल्या आहेत.
या अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील पक्षाच्या तीन महत्त्वाच्या संघटनात्मक विभागांसाठी नवीन अध्यक्षांची घोषणा करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील नवीन काँग्रेस अध्यक्ष जळगाव शहराध्यक्षपदी जमील शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव ग्रामीण पूर्व विभागाच्या अध्यक्षपदाची धुरा धनंजय शिरीष चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. जळगाव ग्रामीण पश्चिम विभागाचे नवीन जिल्हाध्यक्ष म्हणून अविनाश भालेराव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली असून या सर्व नियुक्त्या तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत. आगामी काळात जिल्ह्यातील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी या नवीन नियुक्त्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.









