चोपडा (प्रतिनिधी) : कत्तलीसाठी बेकायदेशीररीत्या वाहतूक करण्यात येत असलेल्या दोन गायींसह सुमारे ४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोपडा शहर पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी दोघांविरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जून २०२६ रोजी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास चोपडा–यावल रोडवरील गोरगावले फाट्याजवळ सार्वजनिक रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार संशयित वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये दोन गायी कत्तलीसाठी नेल्या जात असल्याचे आढळून आले.
या कारवाईत अंदाजे ४ वर्षे वयाची एक लाल-पांढऱ्या रंगाची गावरण जातीची गाय व एक काळ्या रंगाची गाय, प्रत्येकी ४० हजार रुपये किमतीची, तसेच ४ लाख रुपये किमतीचे एमएच-१८/बीजी-४७३५ क्रमांकाचे छोटा हत्ती वाहन असा एकूण ४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी वासुदेव आधार पाटील (वय ५८, रा. घुमावळ बुद्रुक, ता. चोपडा) व जाबीर कुरेशी (पूर्ण नाव व पत्ता अपूर्ण) यांच्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर प्राणी संरक्षण अधिनियम १९६० (सुधारित २०१५) कलम ५(अ), ५(ब) व ९ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. संतोष ज्योतीराम पारधी करीत आहेत. वृत्त लिहिपर्यंत आरोपींना अटक करण्यात आलेली नव्हती.









