नशिराबादमधील खंडेराव मंदिर परिसरातील घटना; पती पोलिसांच्या ताब्यात, हत्येमागील नेमके कारण शोधण्याचे आव्हान
नशिराबाद, ता. जळगाव (प्रतिनिधी) : नशिराबाद येथील खंडेराव मंदिराजवळील खालची आळी परिसरात किरकोळ कौटुंबिक कारणावरून पतीने पत्नीची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मंदाबाई विकास जाधव (भिल्ल) वय ३० या आपल्या पती विकास जगन जाधव (भिल्ल) वय ३५ यांच्यासह नशिराबाद येथे वास्तव्यास होत्या. जाधव कुटुंब मूळचे केकत निंभोरा, ता. जामनेर येथील असून गेल्या सुमारे एका वर्षापासून मोलमजुरीसाठी नशिराबाद येथे वास्तव्यास होते.
सोमवारी दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास घरातील किरकोळ कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हिंसक घटनेत होत आरोपी विकास जाधव याने पत्नी मंदाबाई यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. चेहऱ्यावर व मांडीवर गंभीर स्वरूपाचे वार झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या दाम्पत्याला मोहित नावाचा सात वर्षांचा मुलगा असून या घटनेमुळे त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, आरोपी विकास जाधव याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.
मृत मंदाबाई जाधव यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे पाठविण्यात आला आहे. हत्येमागे केवळ कौटुंबिक वाद कारणीभूत होता की आणखी काही कारण आहे, याचा सर्व बाजूंनी तपास नशिराबाद पोलीस करीत आहेत.









