अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर शहरातील एकता नगर, जिनगर गल्ली परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे ४ लाख ३९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी छगन चुडामण बिऱ्हाडे (वय ५४, रा. एकता नगर, जिनगर गल्ली, अमळनेर) यांच्या घरात २० जून २०२६ रोजी रात्री १०.३० ते २१ जून रोजी सकाळी ८.०० वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. घराचे कुलूप तोडून तसेच नातेवाईकांच्या घरातील कपाट फोडून सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आले.
चोरीस गेलेल्या मालामध्ये सोन्याचे कानातील रिंग, सोन्याची लांब पोत तसेच सोन्याचे पोत-पेंडल यांचा समावेश असून एकूण किंमत सुमारे ४ लाख ३९ हजार ५८५ रुपये असल्याचे सांगण्यात आले.
याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२०/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१(४) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद अशोक काकडीज करीत आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.









