चोपडा (प्रतिनिधी) – तालुक्यातील विरवाडे येथे एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमसंबंधाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात एका संशयित युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विरवाडे येथील रहिवासी असलेल्या ४० वर्षीय तक्रारदार महिला (गृहिणी) यांच्या १६ वर्षे ७ महिने वय असलेल्या अल्पवयीन मुलीसोबत गावातीलच २३ वर्षीय संशयित युवक गणेश एकनाथ भिल्ल याने प्रेमसंबंध जोडले होते. सप्टेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत पीडित मुलगी तिच्या राहत्या घरी एकटीच असल्याचा गैरफायदा घेऊन संशयित गणेश भिल्ल याने तिच्यावर पाच ते सहा वेळा बळजबरीने शारीरिक अत्याचार केला.
हा प्रकार समोर आल्यानंतर पीडितेच्या आईने २१ जून २०२६ रोजी रात्री १०.३६ वाजता चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी गणेश एकनाथ भिल्ल याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ६४(२)(M), ७८ आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायदा कलम ४ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक २६६/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच महिला पोलीस उपनिरीक्षक भवनकुमार देसले यांनी प्रकरणाची दखल घेतली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास चोपडा शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एकनाथ भिसे करत आहेत. आरोपीला अद्याप अटक झालेली नाही.








