ग्रामीण प्रवाशांना मिळणार दिलासा
अमळनेर (प्रतिनिधी) : चोपडा आगाराची एस. टी. बस मारवड, कळमसरे, शहापूर मार्गे सुरू झाल्याने कळमसरे तसेच परिसरातील ग्रामस्थांनी आंनद व्यक्त केला आहे. सुरुवातीला ही बससेवा मारवड, वासरे, खेडी मार्गाने सुरू होती. परंतु प्रवाशी संख्या कमी असल्याने व बऱ्याच दिवसांपासून कळमसरे व परिसरातील ग्रामस्थांची ही बस कळमसरे मार्गे सुरू व्हावी यासाठी आग्रही मागणी होती. चोपडा आगाराचे व्यवस्थापक महेंद्र पाटील यांनी दि. १ जून एसटीचा वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर ही बससेवा सुरू केली आहे.
ही बस चोपडा आगारातून अमळनेर धार, मारवड, कळमसरे, शहापूर, बेटावद, नरडाणा, शिंदखेडा, दोंडाईचा मार्गे नंदुरबार पर्यंत धावेल.एकूणच,यामुळे थेट गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांचीही सोय होणार आहे. दरम्यान प्रवाशांमध्ये आनंद वातावरण पसरले असून, ही बस चोपडा येथून सकाळी ७ वाजता निघेल तर नंदुरबार येथे पोहचण्याची साधारण वेळ ही ११ वाजता असेल. तर नंदुरबारहुन बस परत येताना दुपारी ११. ४५ वाजता निघेल. चोपडा येथे ४. ३० वाजेपर्यन्त पोहचेल.
कळमसरे ग्रामपंचायत व गावाच्या वतीने एसटी कर्मचारी वाहक नितेश पाटील,चालक एम जी जगताप,वाहक आर जे पवार यांचा ग्राम पंचायत सदस्य दिनकर पारधी, विकास संस्थेचे संचालक योगेंद्रसिंह राजपूत मधुकर पाटील,भरत महाजन, विठ्ठल नेरकर,अंबालाल राजपूत, सुदाम सैनदाने, राजेंद्र चौधरी, गजानन पाटील तसेच समस्त कळमसरे ग्रामस्थ यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित जंगी सत्कार केला.