चोपड्यात १५ वर्षीय विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू


मित्रांसोबत फिरायला गेलेल्या हाशीमवर काळाचा घाला; मल्हारपुरा परिसरात हळहळ
चोपडा | प्रतिनिधी : चोपडा शहरातील मल्हारपुरा परिसरातील दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी दुपारी सुमारे २ वाजता घडली. हाशीम अरमान खाटीक असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे मल्हारपुरा परिसरासह संपूर्ण चोपडा शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हाशीम हा त्याचे वर्गमित्र प्रसाद वासुदेव मराठे (१५) आणि शेख अबू सिद्दीक कलीम (१५) यांच्यासोबत वेले गावाच्या दिशेने फिरण्यासाठी गेला होता. परत येताना धनवाडी फाट्याजवळील पाटचारीत पाणी दिसल्याने तिघे तेथे थांबले. हात-पाय धुण्यासाठी हाशीम आणि प्रसाद पाण्यात उतरले.
हाशीम आणि प्रसाद या दोघांनाही पोहता येत नव्हते. तिसरा मित्र शेख अबू सिद्दीक मात्र पाण्यात उतरला नाही. काही क्षणांत हाशीम पुढील बाजूस अधिक खोल पाण्यात गेला आणि बुडू लागला. त्याला बुडताना पाहून प्रसाद व शेख सिद्दीक यांनी आरडाओरड करत मदतीसाठी नागरिकांना आवाज दिला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील काही आदिवासी तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाण्यात उतरून हाशीमचा शोध घेत त्याला बाहेर काढले. त्यानंतर तातडीने १०८ रुग्णवाहिकेला संपर्क करण्यात आला. हाशीमला चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.
शेख अबू सिद्दीक कलीम याने घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, “तुम्हाला पोहता येत नाही, पाण्यात जाऊ नका,” असा सल्ला त्याने हाशीम आणि प्रसादला दिला होता. मात्र, दोघांनी हात-पाय धुवून लगेच परत येतो, असे सांगितले. प्रसाद तुलनेने कमी पाण्यात असल्याने बचावला; मात्र हाशीम अधिक खोल पाण्यात गेल्याने दुर्घटना घडली.
हाशीम, प्रसाद आणि शेख सिद्दीक हे तिघेही दहावीच्या वर्गात शिकत होते. हाशीम आणि प्रसाद हे इयत्ता पहिलीपासून एकत्र शिक्षण घेत होते. बालपणापासूनचा जिवलग मित्र अचानक गमावल्याने प्रसादसह मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हाशीमचे वडील इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतात. मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांनी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली. या घटनेमुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पोहता येत नसताना अथवा पाण्याची खोली व सुरक्षिततेची खात्री नसताना पाण्यात उतरणे जीवघेणे ठरू शकते, याची या दुर्घटनेने पुन्हा एकदा जाणीव करून दिली आहे








