चोपड्यात अवैध वाळू वाहतूक करणारा मालट्रक पकडला; २५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त


चोपडा | प्रतिनिधी : चोपडा शहर पोलिसांनी अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात कारवाई करत वाळूने भरलेला मालट्रक पकडला. या कारवाईत ट्रकसह एकूण २५ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गु.र.नं. ३५५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम ४८(७), ४८(८)(१)(२), पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ मधील कलम १५ आणि मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये अंदाजे ७२ हजार रुपये किमतीची १२ ब्रास वाळू आणि सुमारे २५ लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा मालट्रक यांचा समावेश आहे. त्यामुळे एकूण २५ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला.
ही कारवाई २२ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास चोपडा शहरातील तिरंगा चौक परिसरात करण्यात आली. महसूल पथक आणि पोलिसांना अवैध गौण खनिज वाहतुकीबाबत माहिती मिळाल्यानंतर पथकाने संशयित मालट्रकचा शोध सुरू केला.
तिरंगा चौकाकडे येणारा मालट्रक दिसताच पोलिसांनी त्याला थांबविण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगाने पुढे नेले. पोलिसांनी पाठलाग करून चोपडा–यावल रोडवरील तिरंगा चौकाजवळ मालट्रक अडवला.
चौकशीत चालकाने आपले नाव भूषण दिलीप देवरे (वय २७), व्यवसाय चालक, रा. बोरीस, जि. धुळे असे सांगितले. त्याच्या ताब्यातील टाटा कंपनीच्या मालट्रकमध्ये अंदाजे १२ ब्रास वाळू आढळून आली. सदर वाळू वाहतुकीसाठी कोणतीही परवानगी नसल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी कारवाई केली.
याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल विनोद पाटील करीत आहेत. आरोपीला अद्याप अटक झालेली नसल्याचे नोंदीत नमूद आहे.








