आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट, गावठी कट्टा व दोन जिवंत राऊंड जप्त
सावदा (प्रतिनिधी) :- सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिनावल गावात २७ वर्षीय तरुणाने स्वतःवर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ६ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. निर्मल युवराज महाजन (वय २७) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निर्मल महाजन याने ६ ऑक्टोबर रोजी रात्री १२.०५ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरील बंद खोलीत देशी बनावटीच्या पिस्तुलातून (गावठी कट्टा) स्वतःच्या डोक्याच्या उजव्या बाजूस गोळी झाडून घेतली. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सावदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपासाला सुरुवात केली.
घटनास्थळावरून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल (गावठी कट्टा), आणि दोन जिवंत राऊंड जप्त केले आहेत. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप यांच्याकडे सोपवण्यात आला आहे
मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, सध्या घटनास्थळ परिसरात शांतता आहे.
निर्मल महाजन हे शेती व्यवसायासोबतच केळीचा व्यापार करीत होते. त्याची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यानी आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणातून केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सावदा पोलीस करीत आहेत.








