धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी; दोन जणांविरोधात गुन्हा दाखल
चाळीसगाव (प्रतिनिधी):- शहरातील उत्तम टॉवर परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून हॉटेल चालकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना १८ रोजी मध्यरात्री घडली. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रफुल्ल बापूसाहेब देशमुख (वय ३४, व्यवसाय – हॉटेल चालक, रा. उत्तम टॉवर, हॉटेल ब्रीज कॉर्नर शेजारी, धुळे रोड, चाळीसगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार हर्षल दीपक राठोड (रा. जुना मालेगाव रोड, चाळीसगाव) तसेच त्याच्या सोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास फिर्यादी प्रफुल्ल देशमुख हे उत्तम टॉवर इमारतीसमोरील सार्वजनिक रस्त्यावर उभे होते. त्यावेळी आरोपी हे दुचाकीवरून तेथे आले. जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी हर्षल राठोड याने त्याच्याकडील धारदार शस्त्राने प्रफुल्ल देशमुख यांच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात फिर्यादीच्या उजव्या दंडावर, उजव्या खांद्यावर, पाठीवर तसेच डाव्या हाताच्या बोटांवर वार करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०९, ३(५), ३५१(२) तसेच महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७(१)(३), १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनिरीक्षक योगेश माळी करीत आहेत.









