आमदार मंगेश चव्हाण यांचा राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा
जळगाव (प्रतिनिधी) : खरीप हंगाम सन 2023/24 अंतर्गत राज्यातील 40 दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने सुमारे 2443 कोटी 22 लक्ष मदत मंजूर केली आहे. त्यात चाळीसगाव तालुक्यातील 84 हजार 471 शेतकऱ्यांचा समावेश असून, त्यांना सुमारे 133 कोटी 19 लाखांचे अनुदान प्राप्त होणार आहे. महिन्याभराच्या आत संबंधित सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याचे शासन निर्देश असल्याने चाळीसगावच्या शेतकऱ्यांना दुष्काळात मोठा आधार मिळणार आहे.
आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नाने चाळीसगाव तालुक्याला आतापर्यंत प्राप्त दुष्काळी अनुदानांमध्ये 133 कोटी रूपये ही आजवरची सर्वात मोठी मदत असल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 40 तालुक्यांमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या निकषानुसार दुष्काळ घोषित करण्यात आल्यानंतर त्यात जळगाव जिल्ह्यातील एकमेव चाळीसगाव तालुक्याचा समावेश झाला होता. त्यानुसार आता दुष्काळी तालुक्यांसाठी असणाऱ्या विविध सोयी सवलती चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी लागू झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नाने तालुक्यातील पीकविमा धारक शेतकऱ्यांना 25 टक्के आगाऊ नुकसानभरपाई खात्यात जमा झाली होती. त्यानंतर राज्य शासनाकडून मिळणाऱ्या मदतीची शेतकऱ्यांना अपेक्षा होती. त्यासाठी देखील आमदार मंगेश चव्हाण यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. अखेर त्यात यश मिळाले असून राज्य शासनाने दुष्काळी मदतीची मर्यादा आता 02 हेक्टर वरून 03 हेक्टरपर्यंत केली आहे.
दुष्काळी अनुदान रक्कम देखील वाढवली
राज्य शासनाच्या धोरणानुसार आतापर्यंत कोणतीही नैसर्गिक आपत्ती, दुष्काळी परिस्थिती उद्भवल्यास शेतकऱ्यांना 02 हेक्टरपर्यत मर्यादेत मदत दिली जात होती, त्यामुळे 02 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. मात्र आता राज्य शासनाने आपले धोरण बदलले असून मदतीची मर्यादा 02 हेक्टर वरून 03 हेक्टर केली आहे. तसेच प्रति हेक्टरी अनुदान देखील वाढविण्यात आल्याने शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे. त्यात बहुवार्षिक पिके –22500/- प्रति हेक्टर, बागायत पिके–17500/- प्रति हेक्टर, कोरडवाहू पिके –8500/- प्रति हेक्टर अशा वाढीव दराने शेतकऱ्यांना अनुदान वितरीत करण्यात येईल.