चाळीसगावात दोन गायींची चोरी; ४० हजारांचा मुद्देमाल लंपास
विक्रीसाठी घेऊन जात असताना दोघे संशयित ताब्यात; चोरीचा गुन्हा दाखल
चाळीसगाव : शहरातील शिवदर्शन नगर परिसरातून दोन गायी चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. चोरी झालेल्या गायींची एकूण किंमत सुमारे ४० हजार रुपये असून, या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ ऑगस्ट रोजी सकाळी ७ ते दुपारी २.३० वाजेच्या दरम्यान शिवदर्शन नगर परिसरातील सार्वजनिक जागेवरून एक मोरवी जातीची पांढऱ्या रंगाची, सुमारे पाच वर्षे वयाची गाय किंमत ३५ हजार रुपये आणि मोरवी जातीची भुरकट तांबूस रंगाची सुमारे सात महिन्यांची वासरी किंमत ५ हजार रुपये चोरीला गेली.
फिर्यादी अजित मेघराज राठोड (वय ३४, व्यवसाय नोकरी, रा. शिवदर्शन नगर, चाळीसगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कोमल दिलीप पाटील (वय २८, रा. कुंझर, ता. चाळीसगाव) आणि समाधान बारकू गरुड (वय ४२, रा. आनंदवाडी, चाळीसगाव) यांनी गायी व वासरी चोरी करून विक्रीच्या उद्देशाने चाळीसगाव-कऱ्हगाव मार्गावरील एका गावात विक्री करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, चोरीच्या जनावरांची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरीला गेलेल्या दोन्ही जनावरांची एकूण किंमत ४० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल क्रमांक १९२५ नितीन आगोणे करीत आहेत.








