जळगाव : – वटपौर्णिमेनिमित्त वडाची पूजा करण्यासाठी गेलेल्या एका वृद्ध महिलेची चार तोळे वजनाची पोत लांबविल्याची घटना शुक्रवारी घडली असून याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनंदा सदाशिव पाटील (वय ६७, रा. श्रीकृष्ण कॉलनी) या शुक्रवारी असलेल्या वटपौर्णिमेनिमित्त श्रीकृष्ण कॉलनीतील दत्त मंदिराच्या बाहेर असलेल्या वडाच्या झाडाजवळ पूजन करण्यात येत होते. दुपारी दीड वाजेच्या सुमारास सुनंदा पाटील या देखील त्याठिकाणी पुजेसाठी गेल्या होत्या. मात्र महिलांची गर्दी असल्याने त्या तेथेच थांबल्या. त्यांनी डोक्याला बांधलेला रुमाल सोडला असता, त्यांना आपल्या गळ्यातील मंगलपोत गायब असल्याचे लक्षात आले. त्यांनी त्यांच्या पतीला याविषयी सांगितले असता तेदेखील तेथे पोहचले. त्यांनी मंगलपोत कोणी चोरताना दिसले का, या विषयी विचारणा केली.
सुनंदा पाटील यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नरेश सोनवणे करीत आहेत.