वरणगाव शहरातील साक्री फाट्यावरून घेतले ताब्यात
भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील माजी नगरसेवक संतोष बारसे व सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी फरार संशयित आरोपींपैकी एका तरुणाला भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे शिताफिने अटक करण्यात भुसावळ बाजारपेठ पोलीस यांना यश मिळाले आहे. त्यामुळे आता अटकेतील संशयित आरोपींची संख्या ६ झाली आहे. अजून पाच ते सहा संशयित आरोपी फरार आहेत.
भुसावळ येथे मागील महिन्यात संतोष बारसे व सुनील राखुंडे यांचे कारमधून जात असताना गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणीच्या तपासामध्ये आतापर्यंत पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. एका आरोपीकडून गावठी पिस्तूल व काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
शनिवार दि. २२ जून रोजी दुपारी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक गजानन पडघन यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी वरणगाव शहरांमध्ये साक्री फाटा येथे संशयित आरोपी नितीन पथरोड याला सापळा रचून अटक केली. त्याला भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान या हत्याकांडातील प्रमुख संशयित आरोपी अद्यापही फरार असून त्यांचा शोध घेण्याचे काम निरंतरपणे पोलिसांकडून सुरू आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी कृष्णात पिंगळे, निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विजय नेरकर, यासीन पिंजारी, महेश चौधरी, जावेद शाह, सचिन चौधरी आदी कर्मचाऱ्यांनी केली आहे.